बस वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल

651

 

ओतूर, कुडाणे, भुसणी, शिरसमणी, खेडगाव, रवळजी, नाळीद इत्यादी गावांतून असंख्य विद्यार्थी कळवणपर्यंतचा प्रवास करत असतात. यासाठी कळवण बस स्थानकात या गावातील विद्यार्थ्यांची कायम ये-जा असते. मात्र बसचे वेळापत्रक कोलमडले की विद्यार्थ्यांचे घरी जाण्याचे वेळापत्रकही कोलमडते. त्यांना रात्रीचा प्रवास घडतो. शुक्रवारी सायंकाळीही अनेक विद्यार्थ्यांचे हाल झाले. रात्री-अपरात्री मुलांना प्रवास घडत असल्याने पालकांची चिंता मात्र वाढली आहे.

कळवण येथे अनेक गावांतून मोठय़ा प्रमाणात पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी कळवण येथे येत असतात. सायंकाळी 5.30 वाजता शाळा सुटल्यानंतर 6-6.30 वाजेपर्यंत घरी पोहचतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी 6 वाजेपर्यंत बसने घरी येणारे शालेय विद्यार्थी घरी पोहचले नाहीत म्हणून काळजी वाढल्याने अनेक पालकांनी रात्री 7.30 वाजता कळवण बस स्थानक गाठले. सर्व विद्यार्थी बसची वाट पाहत बस स्थानकात बसल्याचे त्यांना दिसले. कळवण आगाराच्या 50 टक्के बसेस अन्य ठिकाणी गेल्याने कळवण आगाराचे नियोजन कोलमडले आहे. तालुक्यातील खेडेगावात जाणाऱ्या गाडय़ांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर वेळेवर बस न सुटल्याने विद्यार्थ्यांना बस स्थानकातच बस येण्याची वाट पाहत थांबून राहावे लागले.

काळजीपोटी बऱ्याचशा पालकांनी बस स्थानक गाठले होते. यावेळी अन्य बस रद्द करून शालेय विद्यार्थ्यांच्या बसेस वेळेवर सोडा अशी मागणी आगार व्यवस्थापक हेमंत पगार यांच्याकडे पालक व विद्यार्थ्यांनी केली आहे. खेडेगावावरून येणारे अनेक विद्यार्थी मळ्यात, शेताजवळ राहतात. रात्री उशिराने बस आल्यास त्यांना अंधारात ओहळ, नाले, बांधावरून घरी जावे लागते. त्यामुळे अन्य बस रद्द करून शालेय विद्यार्थ्यांच्या बसेस वेळेवर पाठवाव्यात, अशी मागणी पालकांनी केली. कळवण आगारात एकूण 75 बस आहेत. त्यापैकी कोकणातील गणेशोत्सवासाठी 30 बसेस गेल्या आहेत. त्यामुळे स्थानिक फेऱ्यासाठी बसेसचे नियोजन करतांना अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणच्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. पालकांची तक्रार लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्राधान्याने त्या बसेस पाठवल्या जातील, असे आगार व्यवस्थापकांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या