पोटनिवडणुकीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात जाहीर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीमुळे सहकार विभागाने अहिल्यानगर आणि पुणे जिह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 मे 2026 पर्यंत पुढे ढकलल्या आहेत. विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन आदेश  जारी केला. या आदेशाच्या दिनांकापासून सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर 31 मेपर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. या आदेशातून सहकारी गृहनिर्माण संस्थांना वगळण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनामुळे अनुक्रमे बारामती, राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीमुळे प्रशासनिक आणि पोलीस यंत्रणा व्यग्र राहणार आहे. त्यामुळे  सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ, पोलीस बंदोबस्त, मतदान केंद्रांची उपलब्धता याबाबत अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे आदेशात म्हटले आहे.

परंतु, विभागाने सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतरची पहिली पदाधिकारी निवड करणे, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या राजीनाम्यामुळे अन्य पदाधिकाऱयांची निवड करणे, पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर अन्य संचालकांची निवड करणे, ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया, ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशनाचा टप्पा सुरू झाला आहे, अशा निवडणुकांना हा आदेश लागू
राहणार नसल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.