
गुजरातचे दलित नेते आणि वडगामचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी आज गुजरात विधानसभा सभागृहातच नागरिकत्व सुधारणा कायद्याची (सीएए) प्रत टराटरा फाडली. त्यानंतर एनपीआर आणि एनआरसीला आपला कडवा विरोध असल्याचे सांगत आधी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आपले नागरिकत्व सिद्ध करावे, असे आव्हान मेवाणींनी दिले. मुख्यमंत्री रूपाणी यांचे पूर्वज बर्मा देशातून हिंदुस्थानात आल्याचे मेवाणी म्हणाले.
गुजरात विधानसभेत सीएए लागू करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवल्यावर त्यावर चर्चा करताना आमदार मेवाणी संतप्त झाले होते. त्यांनी आजचा दिवस हा गुजरात विधानसभेच्या इतिहासातला काळा दिवस आहे. कारण सभागृहात राज्यघटनाविरोधी ‘सीएए’चा प्रस्ताव ठेवलाय असे सांगून जिग्नेश मेवाणी यांनी या कायद्याची कागदी प्रतच फाडली.





























































