
राज्य शासनाचा महसूल न भरणाऱ्या व्यक्ती, सहकारी संस्था, खासगी संस्था, साखर कारखाने, सूतगिरण्या यांच्याकडून थकीत रकमांच्या वसुलीची धडक मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भरत वाघमारे यांनी दिली. याबाबत पत्रक प्रसिद्ध केले आहे. महाराष्ट्र जमीन महसूलच्या कलमांनुसार महसुली अधिकाऱ्यांना महसूल वसूल करण्याचे अधिकार आहेत. संस्था व्यक्तींनी विहीत मुदतीत थकीत महसूल न भरल्यास संस्थांवर कारवाई करणार आहे. यासाठी विविध संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विहीत मुदतीत थकीत रक्कम न भरल्यास संस्थांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या जाणार आहेत तसेच गरज भासल्यास मालमत्तांची विक्रीदेखील केली जाणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.


























































