देशात रोज फसवणुकीच्या घटना घडत असतात. हे गुन्हेगार अनेक नामवंत व्यक्तींच्या नावाने गरजू व्यक्तिंना फसवून त्यांना लाखोंचा गंडा घालतात. अशातच आता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाने फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायाधीशांनी पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत. देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीच्या नावाचा अशाप्रकारे फसवणूक झाल्याची ही कदाचित पहिलीच घटना आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्ट प्रशासनाने तक्रार दाखल केली आहे.
सोशल मीडियावर मंगळवारी एक पोस्ट व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये सरन्यायाधीशांचा फोटो आणि नावाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये सरन्यायाधीशांच्या नावे मदतीसाठी एक मॅसेज शेअर केला आहे. नमस्कार, मी CJI . माझी कॉलेजियममध्ये तातडीची बैठक आहे. आता सध्या मी कॅनोट प्लेसमध्ये अडकलो आहे. त्यामुळे मला कोणी कॅबसाठी 500 रुपये पाठवू शकता का? हे पैसे मी न्यायालयात गेल्यावर परत करेन, असे या पोस्टमध्ये लिहिले होते.
सरन्यायाधीशांच्या नावाची ही फसवी पोस्ट सोशल मीडियावर वेगाने वायरल झाली. हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्वोच्च न्यायालय प्रशासन तत्काळ सक्रिय झाले आणि पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती देत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
सायबर पोलिसांनी शोध सुरू
सर्वोच्च न्यायालयात आलेल्या तक्रारीच्या आधारे सायबर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गेल्या काही महिन्यांत देशात सायबर फसवणुकीने उच्चांक गाठला आहे. एआय टूल्सच्या आगमनानंतर सायबर गुन्ह्यांतील नवीन प्रकार समोर येत आहेत.