कॅनडाला आठवला हिंदुस्थान

Canada's defence minister Bill Blair

खलिस्तानी दहशतवादी निज्जर याच्या हत्येनंतर कॅनडा आणि हिंदुस्थान यांच्यात तीव्र तणाव निर्माण झाला असतानाच, हिंदुस्थानशी आमचे संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण असून इंडो-पॅसिफिक धोरणासारख्या संयुक्त बाबींसंदर्भात कॅनडाची कटिबद्धता कायम असल्याचे कॅनडाचे संरक्षण मंत्री बिल ब्लेअर यांनी म्हटले आहे.

अर्थात निज्जर हत्येचा न्याय्य मार्गाने तपास सुरू राहील, अशी पुस्ती ब्लेअर यांनी जोडली असली तरी कॅनडाने या हत्येचा हिंदुस्थानशी संबंध जोडणारे कुठलेही ठोस पुरावे आतापर्यंत दिलेले नाहीत.

कॅनडासाठी सोडले हिंदुस्थानी नागरिकत्व

परराष्ट्र कामकाज खात्याने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2018 ते जून 2023 या कालावधीत सुमारे 1.6 लाख हिंदुस्थानींनी आपले नागरिकत्व सोडून कॅनेडियन नागरिकत्व स्वीकारले आहे. अमेरिकेनंतर नागरिकत्वासाठी हिंदुस्थानींची कॅनडाला सर्वाधिक पसंती आहे.

कॅनेडियन नागरिकांना पुन्हा सावधगिरीचे आवाहन

सध्याच्या घडामोडींमुळे समाज माध्यमांवर कॅनडाविरुद्ध नकारात्मक भावना आणि निदर्शनांची आवाहने होत असताना हिंदुस्थानातील कॅनेडियन नागरिकांनी प्रवास करताना सतर्क राहून सावधगिरी बाळगावी, अशा नव्या सूचना कॅनडाने जारी केल्या आहेत.