
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची अनामत रक्कम भरण्यासाठी नेलेली चिल्लर प्लॅस्टिक पिशवीमध्ये आणल्याने अपक्ष उमेदवाराला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम वसूल केल्यानंतरच त्यांच्याकडून उमेदवारी अनामत रक्कम घेण्यात आली. दरम्यान, अपक्ष उमेदवाराला चिल्लरगिरी महागात पडल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.
नेवासा तालुक्यातील देवगाव येथील मच्छिंद्र देवराव मुंगसे असे कारवाई झालेल्या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून, आज दुपारी मुंगसे हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले होते. मुंगसे यांनी अनामत रक्कम भरण्यासाठी दहा हजार रुपयांची चिल्लर आणली होती. यामध्ये त्यांनी चिल्लरचे पाचशे रुपयांचे एक याप्रमाणे वीस बंडल प्लॅस्टिक पॅकेटमध्ये आणले होते. प्लॅस्टिक बंदी असतानाही चिल्लर प्लॅस्टिकमध्ये आणल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे व सहायक निवडणूक अधिकारी समीर शेख यांच्या लक्षात येताच, त्यांनी मुंगसे यांना पाच हजारांचा दंड ठोठावला. मुंगसे यांच्याकडून प्रथम दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणलेली चिल्लर घेण्यात आली. दरम्यान, प्लॅस्टिक बंदीची झालेली कारवाई आणि मुंगसे यांना चिल्लरगिरी महागात पडल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.





























































