
सामना प्रतिनिधी । पारनेर
पारनेर तालुक्यातील राळेगणथेरपाळ येथील चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नारायण खोसे यास लवकरात लवकर कठोर शासन व्हावे यासाठी हा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा तसेच चार दिवसांपासून बेपत्ता झाल्यानंतर विहीरीत मृतदेह आढळून आलेल्या बार वर्षीय दिव्या कारखिले हीच्या संशयास्पद मृत्यूची कसून चौकशी करून घातपात झालेला असल्यास आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी पारनेर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पारनेर पोलीस ठाण्यावर कँडल मार्च नेऊन निषेध सभा घेतली.
शहरातील महात्मा फुले पुतळयापासून कँडल मार्चला प्रारंभ झाला. बाजारपेठेतून पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तेथे निषेध सभा घेण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. रफीक सययद, तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, नगराध्यक्षा वर्षा नगरे, शाहीर भास्कर गायकवाड, नगरसेवक डॉ. मुदस्सिर सययद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, शंकर नगरे, डॉ. संदीप औटी, डॉ. विनायक सोबले, डॉ. प्रमोद पितळे, दत्ता आंबुले, युवराज पाटील, गणेश कावरे, अंकुश गायकवाड, इंद्रभान गाडेकर, सहदेव घनवट, दानिश शेख, शुभम देशमुख, नितीन औटी, गिरीश साळवे, आम्रपाली नगरे, काजल नगरे आदी यावेळी उपस्थित होते.
अत्याचारीत मुलीचे कुटूंब पुणे जिल्ह्यातून मोलमजुरीसाठी राळेगणथेरपाळ येथे आलेले आहे. अत्याचाराचे प्रकरण दडपण्यासाठी गावातील काही व्यक्तींनी या कुटूंबावर दबाव आण्याची चर्चा आहे. पोलिसांनी या व्यक्तींना अत्याचाराच्या गुन्हयातील आरोपी करावे अशी मागणी करतानाच या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेविषयी यावेळी संशय व्यक्त करण्यात आला.
अत्याचार प्रकरण व दिव्या कारखिले मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य रितीने करण्यात येईल. अत्याचार प्रकरण दडपण्याचे प्रयत्न झाले असल्याचे निष्पन्न झाल्यास सबंधितांना अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपी करण्यात येईल, अशी ग्वाही सहाययक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी यावेळी दिली. विविध मान्यवरांनी आपल्या भावना मांडल्यानंतर निषेध सभेचा समारोप करण्यात आला.






























































