
टीम इंडियाचा माजी विश्वविजयी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे लाखो चाहते देशभरातच नाही, तर परदेशातही आहेत. जागतिक क्रिकेटमधील धोनीचे स्थान आगळेच आहे. सध्या तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर गेला असला तरी तो आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. ‘कॅप्टन पूल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या धोनीचे पाकिस्तानमध्येही चाहते आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ हादेखील त्यापैकी एक. धोनीने रौफला ऑटोग्राफ केलेली जर्सी भेट दिली, त्यानंतर या पाकिस्तानी गोलंदाजाच्या आनंदाला पारावार उरला नाही. रौफला भेट पाठवणाऱ्या माहीचे अवघ्या क्रिकेटजगतात कौतुक होत आहे. माहीने त्याची चेन्नई सुपर किंग्जची 7 क्रमांकाची जर्सी रौफला भेट म्हणून दिली आहे. या जर्सीवर धोनीचा ऑटोग्राफ दिसत आहे. हॅरिसने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली. रौफने चेन्नई सुपरकिंग्जचे संघ व्यवस्थापक रसेल राधाकृष्णन यांचेही धोनीच्या कृतीबद्दल आभार मानले आहेत.
























































