
मुंबई-नाशिक महामार्गावर नाशिककडून भिवंडीकडे निघालेल्या एका मालवाहू ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक महामार्गावरील वासिंद नजीक खातिवली जवळील धिंग्रा हॉटेल समोरील महावितरण विभागाच्या मुख्य सप्लाय असलेल्या एच टी लाइन्सच्या विद्युत पोलला जाऊन धडकला. या घटनेत एक दुचाकी चालक व ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात महावितरणच्या एचटी पोलच्या मुख्य विद्युत वाहिन्या पोलसह तुटून पडल्याने वासिंद, खातिवली, साने, पाली, पळसोली, काकडपाडा, शेरा, शेई, मासवणे, बावघर, काजळविहीर, पाषाणे, गेरसे, कोसले, दहागाव या परिसरातील गाव पाड्यातील सुमारे 60 हजार लोकवस्ती अंधारात बुडाली आहे. खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी घटनास्थळी अपघातात तुटून पडलेल्या पोल व विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे, असे महावितरण कंपनीचे वासिंदचे सहायक अभियंता अभिजित बावडेकर यांनी सांगितले.


























































