
2008 च्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 38 दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाचे कौतुक करणारे एक कार्टुन गुजरात भाजप युनिटने ट्विट केलेले होते. ट्विटरवरील वादानंतर ते ट्विट काढून टाकण्यात आले आहे.
गुजरात भाजपचे प्रवक्ते यज्ञेश दवे यांनी रविवारी सांगितले की, “2008 च्या साखळी बॉम्बस्फोटांच्या निकालावरील पोस्ट कोणाच्यातरी तक्रारीनंतर ट्विटरने काढून टाकली आहे.”
या ट्विटमध्ये एक कार्टुन टाकण्यात आले होते. कार्टूनमध्ये काही पुरुष टोप्या घातलेले, फासावर लटकलेले दाखवले. त्याच्या पार्श्वभूमीवर तिरंगा होता आणि बॉम्बस्फोटाचे दृश्य दर्शविणारे चित्र होते, वरच्या उजव्या कोपर्यात “सत्यमेव जयते” लिहिलेले होते.
अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील विशेष न्यायालयाच्या निकालाच्या एका दिवसानंतर शनिवारी गुजरात भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे पोस्ट करण्यात आले. या प्रकरणी न्यायालयाने 38 दोषींना फाशी आणि 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या स्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते.



























































