वैद्यकीय अधिकाऱ्याशी हुज्जत; दोघांविरोधात गुन्हा

जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्या प्रकरणी दोघांविरोधात जोगेश्वरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे डॉक्टर असून ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात काम करतात. गेल्या आठवड्यात अपघात विभागात रुग्णांनी प्रचंड गर्दी केली होती. ती गर्दी पाहून एकाने आरडाओरड सुरू केली. तेव्हा त्याला रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी यांनी समजावून सांगितले. त्याची समजूत काढत असताना आणखी एका रुग्णाने शाब्दिक वाद घालण्यास सुरुवात केली. ते दोघे रुग्ण प्रचंड आक्रमक झाले. कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती जोगेश्वरी पोलिसांना देण्यात आली.