
सामना प्रतिनिधी । अहमदपूर
तालूक्यातील लिंगदाळ येथील विवाहितेचा 10 लाखासाठी सासरच्या मंडळीने छळ केला, मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शिल्पा रामेश्वर मरे (लिंगदाळ, ता. अहमदपूर) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचा विवाह रामेश्वर विनायक मरे (येनगेवाडी, ता. चाकुर) यांच्यासोबत 8 मे 2017 रोजी झाला. एक वर्ष असे तसे गेले नंतर सासू, सासरा, नणंद आणि पती व्यापारासाठी 10 लाख रुपयांची मागणी करू लागले. मानसिक, शारीरिक छळ करू लागले. लग्नात ठरलेला हुंडा देऊन सर्व रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले आहे. मी 10 लाख रुपये देऊ शकत नाही असे सांगितले असता पती रामेश्वर याने लाथाबुक्क्याने मारहाण केली. शिवीगाळ केली. सासू, सासरा, दोन नणंद यांनीही मारहाण करून उपाशीपोटी ठेवले.
महिला समुपदेशन मदत केंद्र पंचायत समिती अहमदपूर येथे तक्रार दाखल केली, नोटीस बजावली. मात्र सासरचे लोक येत नाहीत. नंतर 27 जानेवारी रोजी सर्व सासरच्या मंडळीने येऊन 10 लाख रुपये द्या, नाही तर फारकत द्या, असे धमकी देत आपल्याला व आपल्या वडिलांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. पैसे दिल्याशिवाय मुलीला नांदवणार नाही, दुसरे लग्न करून घेतो असे म्हणत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी शिल्पा मरे यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात वंदना विनायक मरे (सासू), विनायक व्यंकटी मरे (सासरा), महानंदा नरसिंग यलनाटे (नणंद), अश्विनी आवळे (नणंद), रामेश्वर विनायक मरे (पती) या पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.




























































