
पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंत्यासह त्याच्या नातेवाईकाला एक लाखाची लाच घेताना शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबतची तक्रार लाचलुचपत विभागात देणाऱया कंत्राटदाराला ही तक्रार मागे घेण्यासाठी धमकाविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या मिरजेतील दोन नेत्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब होनमोरे, अभिजित मल्लिकार्जुन हारगे, तानाजी रुईकर आणि उमेश मिरजे अशी अदखलपात्र गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
एका खासगी कंत्राटदाराला वारणाली वसाहत, पाटबंधारे ऑफिस परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, उपाहारगृह, दुरुस्तीकरिता स्वीपर पुरविण्याचे टेंडर मिळाले होते. या टेंडरची वर्कऑर्डर देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत मारुती नलवडे यांनी तक्रारदार कंत्राटदाराकडे एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा तक्रार अर्ज 1 ऑगस्ट रोजी लाचलुचपत विभागाकडे दिला होता. या तक्रारीनुसार शुक्रवारी (दि. 5) पडताळणी केली असता, नलवडे यांनी वर्कऑर्डर देण्यासाठी एक लाखाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
लाचलुचपत विभागाच्या पथकाने तातडीने सापळा लावला असता, नलवडे यांनी लाचेची रक्कम त्यांचे पाहुणे राहुल कणेगावकर यांच्याकडे देण्यास सांगितली. त्यानंतर तक्रारदाराकडून कुपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिरजवळ असणाऱया ‘सह्याद्री कन्स्ट्रक्शन’च्या कार्यालयात एक लाख रुपये घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने कणेगावकर यांना रंगेहाथ पकडले. यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार लाचलुचपत कार्यालयाच्या बाहेर उभे होते. यावेळी बाळासाहेब होनमोरे, अभिजित हारगे, तानाजी रुईकर आणि अशोक घाटे यांनी तक्रार मागे घेऱयासाठी धमकी दिल्याचे तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी चौघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.





























































