
पुणे शहरातील कात्रज परिसरात एका होर्डिंग्जवर कात्रजचा खून झाला, अशा आशयाचे फ्लेक्स लावणाऱ्या अज्ञाताविरुद्ध भारती विद्यपीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हनुमंत तुकाराम लोणकर (वय 52, रा. शिवगंगा सोसायटी, कोंढवा खुर्द) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरात अज्ञाताने एका होर्डिंग्जवर आकाशचिन्ह विभागाची परवानगी न घेता कात्रजचा खून झाला अशा आशयाचे फ्लेक्स लावले आहे. त्यानुसार तक्रारदार लोणकर हे महानगरपालिका आकाश चिन्ह विभागात परवाना निरीक्षक म्हणुन नोकरीस आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीने सातारा रोडवर, कात्रज चौक येथील कात्रज जुना सर्व्हे नंबर एक जागेत पुणे मनपाचे आकाश चिन्ह विभागाची कोणतीही परवानगी न घेता ” कात्रजचा खून झाला” अशा आशयाचा बोर्ड विनापरवाना, अनधिकृतपणे लावत विद्रुपीकरण केले. संबंधितावर सार्वजनीक मालमत्ता विरुपनास प्रतिबंध अधिनियम 1995 चे कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.


























































