
जिल्हाधिकारी कार्यालयातील तत्कालीन वर्ग-1 अधिकाऱ्याच्या अंगरक्षक पोलीस कर्मचाऱ्याने विरोधी पार्टीकडून एक कोटीची ऑफर आली असून, काम होण्यासाठी तक्रारदाराकडे त्यापुढच्या रकमेची लाच मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या पोलीस कर्मचाऱ्यावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एका पोलीस नाईककडून चक्क एक कोटीच्या पुढे लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वीच असे किती प्रकार झाले, या साखळीत आणखी कोण आहे, याचा तपास करण्याची मागणी जनतेकडून होऊ लागली आहे.
जॉन वसंत तिवडे (नेमणूक पोलीस मुख्यालय, कोल्हापूर, रा. कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे पोलीस नाईकचे नाव आहे. तक्रारदाराचे पुणे जिह्यातील देहूगाव येथील शेतीबाबत महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, पुणे खंडपीठात तीन दावे सुरू होते. या कालावधीत एका अज्ञाताने फोनवरून तक्रारदाराशी ‘एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचे आहे, तुम्ही भेटा,’ असे सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने 25 फेब्रुवारी 2022 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात त्या व्यक्तीची भेट घेतली. त्यावेळी ती व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात येऊन भेटली. त्या पोलीस कर्मचाऱयाने संबंधित दाव्यांच्या निकालासंदर्भात ‘तुमच्या विरोधातील पार्टीने आम्हाला एक कोटीची ऑफर दिली आहे. तुम्ही किती देता ते बोला! तसेच केसचा निकाल तुमच्या बाजूने लावून देतो. तुम्ही किती रुपये देऊ शकता?’ असे म्हणून लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदाराने कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
पडताळणीत 22 मार्च 2022 रोजी पोलीस नाईक तिवडे याने शासकीय पंच-साक्षीदारांसमोर मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये तक्रारदाराकडे त्यांच्या जमिनीबाबत एमआरटी कौन्सिल, पुणे येथील दाव्यांचे निकाल तेथील प्रशासकीय सदस्य माने यांना सांगून त्यांच्या बाजूने लावून देण्यासाठी विरुद्ध पार्टीने एक कोटी रुपयांची ऑफर दिली असून, तक्रारदारांना त्यांच्या घरच्यांशी चर्चा करून, विरोधी पार्टीच्या ऑफरप्रमाणे करा, असे सांगून लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस नाईक जॉन वसंत तिवडे याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिवडे याचा शोध सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपआयुक्त राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, विकास माने, सुनील घोसाळकर, मयूर देसाई, रूपेश माने आदी कर्मचाऱयांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.



























































