टीव्ही मालिकांमध्ये काम देण्याच्या बहाण्याने तरुणीवर दोघांचा बलात्कार

2947
प्रातिनिथिक फोटो

टीव्ही मालिकांमध्ये काम मिळवून देण्याच्या बहाण्याने एका तरुणीला मुंबईतून पुण्यात आणून लॉजमध्ये तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोघांसह एका महिलेविरोधात पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भालचंद्र प्रमोद कोलवाडकर (रा. पटवर्धन मैदानाशेजारी, नागपूर), समीर विजय चौधरी (रा. त्रिमुर्ती नगर, नागपूर) आणि छाया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 28 वर्षांच्या तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी मूळची अकोल्याची असून कामानिमित्त मुंबईत राहते. छायाने 8 फेब्रुवारीला तरुणीला ओळखीच्या निर्मात्याकडून टीव्ही मालिकांमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी तिने तरुणीला मुंबईतून खासगी मोटारीने विमानतळ परिसरात आणले. तेथे एका लॉजमध्ये तिची राहण्याची व्यवस्था केली. भालचंद्र आणि समीर 9 फेब्रुवारीला लॉजमध्ये गेले. त्यांनी टीव्ही मालिकांमध्ये काम देण्याचे प्रलोभन दाखवत तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. तरुणीने मागणी फेटाळून लावली. तेव्हा छायाने बिअरच्या बाटलीने मारहाण करुन तरुणीला जखमी केले. त्यानंतर भालचंद्र आणि समीरने तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या