देशात सध्या जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना व्हायलाय हवी अशी मागणी लावून धरली आहे. एवढेच नाही तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) मधील घटकपत्र जदयू आणि लोक जनशक्ती पार्टीनेही या मागणीचे समर्थन केले आहे. मात्र ही मागणी म्हणजे हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपने केला. संघानेही राजकीय फायद्यासाठी याचा वापर होऊ नये असे म्हटले आहे. यावरून राजदचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आक्रमक होत भाजप आणि संघावर निशाणा साधला आहे.
लालू प्रसाद यादव यांनी मंगळवारी सकाळी आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत भाजप आणि संघाकडून जातनिहाय जनगणना करून घेऊ असे म्हटले. या भाजप आणि आरएसएसच्या लोकांचे कान पकडून, उठाबशा मारायला लावून त्यांच्याकडून जातनिहाय जनगणना करून घेऊ. जातनिहाय जनगणनेला नाही म्हणायची यांची लायकी आहे का? असा संतप्त सवाल लालू प्रसाद यादव यांनी केला.
जातनिहाय जनगणना करण्यासाठी आम्ही त्यांना मजबूर करू. त्यांच्यापुढे आम्ही दुसरा कोणता पर्यायच ठेवणार नाही. दलित, मागासवर्गीय, आदिवास आणि गरीबांनी आता एकजूट दाखवण्याची वेळ आलेली आहे, असेही लालू प्रसाद यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
संघाची भूमिका काय
भाजपमधून जातनिहाय जनगणनेविरोधी सूर असताना भाजपची पितृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातनिहाय जनगणेनेचे समर्थन केले आहे. समाजाच्या विकासासाठी जातनिहाय जनगणना केली पाहिजे; मात्र या आकडेवारीचा वापर राजकीय फायद्यासाठी होऊ नये, असे संघाने नमूद केले.
आकडेवारीचा वापर केवळ…
केरळमधील पलक्कड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय समन्वय बैठकीनंतर मुख्य प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जातनिहाय जनगणनेबाबत संघाची भूमिका स्पष्ट केली. मागासवर्गीय समाजाला सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सरकारला विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारकडे जातीसंदर्भातील आकडेवारी असणे आवश्यक आहे. अशी आकडेवारी गोळा करण्याची पद्धत जुनीच आहे. सध्याच्या सरकारद्वारे पुन्हा ही आकडेवारी गोळा केली जाऊ शकते. मात्र, या आकडेवारीचा वापर केवळ मागासवर्गीयांना कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी व्हायला हवा. या आकडेवारीचा वापर राजकीय फायद्यासाठी होऊ नये, असे आंबेकर म्हणाले.
भाजपची गोची
काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्ष सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. एनडीएचा घटकपक्ष असलेल्या जेडीयू आणि लोक जनशक्ती पक्षानेही याचे समर्थन केले आहे. भाजपने मात्र ही मागणी म्हणजे हिंदू धर्मात फूट पाडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, अशी टीका केली आहे. संघाने मांडलेल्या भूमिकेने भाजपची गोची झाली आहे.