CBSE निकाल वाद – त्रुटी आढळल्यास कोणालाही सोडणार नाही; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वीकारली जबाबदारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) पद्धतीवरून देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यावर आता थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या संपूर्ण वादावर भाष्य केले आहे. या उद्भवलेल्या परिस्थितीची नैतिक जबाबदारी स्वीकारत, शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थी आणि पालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मूल्यमापन प्रक्रियेत कोणतीही अनियमितता किंवा त्रुटी आढळल्यास त्यास जबाबदार असणाऱ्या ‘कोणालाही सोडले जाणार नाही’ असे ठोस आश्वासन प्रधान यांनी दिले आहे.

दिल्लीमध्ये सीबीएसईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी मी स्वतः घेत आहे. यात निर्माण झालेल्या त्रुटी नक्कीच दुरुस्त केल्या जातील आणि त्यावर योग्य तो तोडगा काढला जाईल. आमचे संपूर्ण मंत्रालय आणि संबंधित अधिकारी सध्या याच कामात व्यग्र आहेत. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून अस्पष्ट किंवा अपूर्ण स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका, न तपासलेले प्रश्न, पोर्टल क्रॅश होणे, पेमेंट अपयशी ठरणे आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रियेतील ढिसाळ कारभार अशा अनेक गंभीर तक्रारी सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी विद्यार्थ्यांचा मानसिक ताण मान्य केला असला तरी त्यांनी बोर्डाच्या या नवीन डिजिटल मूल्यांकन मॉडेलचे जोरदार समर्थनही केले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी या डिजिटल प्रणालीची व्याप्ती स्पष्ट करताना सांगितले की, परीक्षा दिलेल्या 17 लाख विद्यार्थ्यांच्या एकूण 98 लाख उत्तरपत्रिका सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक उत्तरपत्रिकेत सरासरी 40 पाने असतात, या हिशोबाने एकूण 40 कोटी पानांच्या प्रती स्कॅन करण्यात आल्या आहेत. ऑन-स्क्रीन मार्किंग सिस्टीम (OSM) हे एक अत्यंत प्रगत आणि प्रगतिशील साधन असून जगभरातील नामवंत शैक्षणिक संस्था याचा वापर करत आहेत. ही प्रणाली पूर्णपणे विद्यार्थी-केंद्रीत असून गुणांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठीच ती लागू करण्यात आली आहे, असा दावा त्यांनी केला.