
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएससी) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची (सीटीईटी) घोषणा केली आहे. ही परीक्षा रविवार, 6 सप्टेंबर 2026 रोजी देशभरात होणार असून यामध्ये पेपर-1 आणि पेपर-2 चा समावेश असेल. इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 11 मे 2026 पासून सुरू झाली आहे.
सीबीएसईने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उमेदवारांना 10 जून 2026 रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. अर्जाचे शुल्क भरण्यासाठीदेखील हीच अंतिम मुदत देण्यात आली आहे. अर्जामध्ये काही चुका झाल्यास त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी उमेदवारांना 15 जून ते 18 जून 2026 या कालावधीत ‘ऑनलाइन करेक्शन’ची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत अर्जात बदल करण्याची विनंती मान्य केली जाणार नाही, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. परीक्षा केंद्र निवडीबाबत नवीन नियम आहेत.
सर्व उमेदवारांना रँडम पद्धतीने सीबीएसईद्वारे परीक्षा शहर दिले जाईल. एकदा मिळालेले केंद्र बदलण्याची विनंती कोणत्याही कारणास्तव स्वीकारली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ही परीक्षा एकूण 27 भाषांमध्ये घेतली जाईल. देशभरातील 132 शहरांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या दोन दिवस आधी उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्रे अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येतील.
























































