
शहरात रमजान ईद साजरी होत असताना अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. तब्बल तीन हजारांवर अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची फौज रस्त्यावर कार्यरत होती. विशेषतः मागील काही दिवसांपासून काही राजकीय पक्षांकडून धार्मिक स्थळांवरील भोंग्याच्या आवाजाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे पोलिसांनी खबरदारी घेतली होती. त्याशिवाय पोलिसांकडून सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते.
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला होता. त्यासाठी सायबर पोलिसांसह विशेष शाखेतील एका कक्षात पथकाकडून विविध पोस्टची पडताळणी करण्यात आली. त्यामधील बहुतांश पोस्ट करण्यात आलेले मेसेज शुभेच्छा आणि सुसंवाद वातावरण निर्मितीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे शहरात कोठेही अनुचित घटना घडली नाही. शहरातील विविध भागांत पोलिसांकडून आज पहाटेपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी एक वाजल्यानंतर काही ठिकाणावरील बंदोबस्त कमी करण्यात आला.
पोलिसांनी असा ठेवला होता बंदोबस्त
सहपोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त 3, सहायक पोलीस आयुक्त 19, पोलीस निरीक्षक 81, सहायक पोलीस निरीक्षक 331, पोलीस अमलदार 2 हजार 601, एसआरपीएफ तुकडी, बॉम्बशोधक आणि नाशक पथक, होमगार्ड
रमजान ईद उत्साहात साजरी
प्रेम आणि बंधुत्वाचे प्रतिक असलेली रमजान ईद मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुभार्वानंतर दोन वर्षांनी ईद साजरी करताना मुस्लिम बांधवांनी नमाज पठण झाल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेउन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील विविध भागात मशीदींमध्ये मुस्लिम बांधवांनी सकाळच्या सुमारास नमाज पठण केले. रमजान महिन्याची सुरूवात 2 एप्रिलला चंद्रदर्शनाने झाली होती. त्यानंतर मुस्लिम समाजातील सर्व लहान वयोवृद्ध नागरिकांनी महिनाभर रोजा ( उपवास ) केला. या महिन्यात रोजा, रात्रीची तराबिह विशेष नमाज, शबे कद्रची रात्र, कुराण पठण, जकातुल फित्र संपन्न झाली. याकाळात बहुतांश मुस्लिम बांधवांनी पाच वेळेस नमाज पठण केली.

























































