गोड पाडवा, सरकारी कर्मचाऱयांच्या महागाई भत्यात 3 टक्क्यांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुढीपाडवा दोन दिवसांवर आला असतानाच सरकारी कर्मचाऱयांना बुधवारी महागाई भत्त्याची मोठी खूशखबर मिळाली. केंद्र सरकारसह महाराष्ट्र सरकारने आपल्या कर्मचाऱयांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला. त्यानुसार आता केंद्रीय कर्मचाऱयांना 34 टक्के, तर राज्य सरकारच्या कर्मचाऱयांना 31 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱयांचा पाडवा आणखी गोड झाला आहे.

देशात वाढत्या महागाईने सर्वांना बेजार करून सोडले आहे. ही महागाई लक्षात घेत केंद्र आणि राज्य सरकारने बुधवारी एकाच दिवशी आपल्या कर्मचाऱयांना महागाई भत्तावाढीची मोठी गिफ्ट दिली. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे केंद्राच्या तिजोरीवर वर्षाला 10 हजार कोटींचा बोझा पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये केंद्रीय कर्मचाऱयांचा महागाई भत्ता 28 टक्क्यांवरून 31 टक्क्यांपर्यंत वाढवला होता.

केंद्रीय कर्मचाऱयांसाठी…

z केंद्रीय कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यातील वाढ पूर्वलक्षी प्रभावाने 1 जानेवारीपासून जूनपर्यंत लागू असेल. या निर्णयाचा देशातील सुमारे 48 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना लाभ मिळेल.

राज्य सरकारच्या कर्मचाऱयांसाठी…

z महाराष्ट्र सरकारने 1 जुलै 2021 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ पगारावरील अनुज्ञेय महागाई भत्ता 28 टक्क्यांवरून 31 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. कर्मचाऱयांना 1 जुलै 2021 पासूनच्या थकबाकीसह मार्च 2022 च्या पगारासोबत रोखीने 31 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे.