
मे महिन्यातील जीएसटी संकलनाचे आकडे आले आहेत. मे महिन्यातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 44 टक्क्यांनी वाढून सुमारे 1.41 लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थ मंत्रालयाने बुधवारी मे महिन्याच्या जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर करताना ही माहिती दिली. या आकडेवारीनुसार, मे महिन्यात एकूण जीएसटी महसूल संकलन 1,40,885 कोटी रुपये होते. मात्र गेल्या दोन महिन्यांतील जीएसटी संकलनापेक्षा हा आकडा 16 टक्क्यांनी कमी आहे.
एप्रिलमध्ये 2022 मध्ये जीएसटी संकलन 1.68 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर होते. त्याआधी, मार्चमध्ये जीएसटी संकलन 1.42 लाख कोटी रुपये होते. अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, मे महिन्याच्या 1,40,885 कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनात केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) चा हिस्सा 25,036 कोटी रुपयांचा आहे. राज्य जीएसटी (एसजीएसटी) संकलन 32,001 कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटी संकलन 73,345 कोटी रुपये होते. याशिवाय 10,502 कोटी रुपयांचा उपकरही जमा झाला. मार्चपासून सलग तिसऱया महिन्यात जीएसटी संकलन 1.40 लाख कोटींच्या पुढे गेले आहे.
जीएसटी संकलनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
मे 2022 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या 5 राज्यांमध्ये आघाडीवर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात जीएसटी संकलन 50 टक्क्यांनी वाढून 20 हजार 313 कोटी रुपये झाले आहे. या यादीत गुजरात आणि कर्नाटक दुसऱया आणि तिसऱया स्थानावर आहेत.



























































