रोजची रखडकथा थांबण्यासाठी मध्य रेल्वेचा ‘असा’ आहे अॅक्शन प्लॅन!

सामना प्रतिनिधी । मुंबई

गेला महिनाभर मध्य रेल्वेच्या लोकलसेवेचे रोजचे बारा वाजत असल्याने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी मध्य रेल्वेने विविध निर्णय घेतले आहेत. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा वेग वाढविण्यात येणार असून त्यामुळे लांबपल्ल्याच्या गाडय़ांना वेळेत बाहेर काढणे शक्य होणार आहे. तसेच अनेक ठिकाणी लोकल ट्रेनच्या वेगावर अनेक वर्षांपासून घालण्यात आलेले निर्बंध हटविण्यात येणार आहेत. या सर्व तांत्रिक कामासाठी महिनाभराचा कालावधी लागणार असून त्यानंतर मध्य रेल्वेचे बिघडलेले गाडे पुन्हा रुळावर येईल अशी रेल्वे अधिकाऱयांना आशा आहे.

गेल्या महिनाभरापेक्षाही जास्त काळ मध्य रेल्वेच्या गाडय़ांचा लेटलतिफ कारभार सुरू असून वारंवार होणाऱ्या सिग्नल यंत्रणेतील बिघाड, मोटरकोचमधील बिघाडाने परिसीमा गाठली आहे. रुळांना तडे जाणे, ओव्हरहेड वायरचे बिघाड, रेल्वे फाटकांचे जादा काळ उघडे राहणे यामुळे गाडय़ांचे वेळापत्रक रोज विस्कळीत होत आहे. या प्रश्नावर भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी लोकसभेत मुद्दा मांडत मुंबईच्या लाइफ लाइनकडे लक्ष देण्याची मागणी केली. त्यानुसार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आदेश देताच शनिवारी मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांनी अधिकाऱयांची बैठक घेतली आणि वेळापत्रक सुधारण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सध्या केवळ कल्याण ते दिवा आणि ठाणे ते लोकमान्य टिळक टर्मिनस असा पाचवा आणि सहावा मार्ग तयार आहे. या मार्गाचा वेग सध्या प्रतितास 60 ते 90कि.मी. इतका आहे. त्याचा वेग 105 कि.मी. प्रतितास वाढविण्यासाठी तांत्रिक बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतून बाहेर पडणाऱ्या मेल-एक्स्प्रेसना वेगाने बाहेर काढता येणार आहे. विक्रोळी, ठाणे, डोंबिवली व कल्याण येथे गेल्या पन्नास वर्षांपासून लोकल गाडय़ांसाठी प्रतितास 30 ते 60 कि.मी.पर्यंतची वेगमर्यादा घातली होती. ती हटविण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी घेण्यात येणार आहे. या दोन महत्त्वाच्या नियोजनांसह अन्य तांत्रिक समस्यांची अंमलबजावणी करण्यासाठी किमान एक महिना लागणार आहे आणि त्यानंतरच वेळापत्रक सुधारणार आहे.

उद्घोषणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

सध्या मध्य रेल्वे स्थानकांत उद्घोषणा योग्य प्रकारे होत नसल्याने प्रवाशांचा गोंधळ होत असतो. या उद्घोषणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांच्या काही तांत्रिक समस्या असल्यास त्या सोडवल्या जाणार आहेत.