मोटरमन-गार्डच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मध्य रेल्वेच्या मोटरमनच्या सतर्कतेमुळे रुळांवर जखमी अवस्थेत पडलेल्या एका महिलेचे प्राण बचावले आहेत. या प्रकरणात प्रसंगावधान दाखविणारे मोटरमन आर. एस. तिवारी आणि गार्ड एस. डब्ल्यू. बोरकर यांना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आणि विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र आणि पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले आहे.

टिटवाळा लोकलचे मोटरमन आर. एस. तिवारी यांना सोमवारी माटुंगा आणि शीव स्थानकांच्या दरम्यान डाऊन आणि अप मार्गाच्या मध्ये एक महिला जखमी अवस्थेत पडलेली आढळली. त्यांनी लागलीच लोकलचे ब्रेक दाबत गाडी थांबवली आणि गार्ड एस. डब्ल्यू. बोरकर यांना यासंदर्भात माहिती दिली. & बोरकर यांनी या जखमी महिलेला लेडीज कोचमध्ये चढविले. त्यानंतर जीआरपीचे कॉन्स्टेबल शेख यांच्या मदतीने या महिलेला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.