
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरून प्रवास करणात्या प्रवाशांना नेरुळ स्थानक सोडल्यानंतर पुढील स्थानक सीवूड-दारावे-करावे, अशी उद्घोषणा ऐकू येणार आहे. रेल्वे प्रशासनाने नेरुळ आणि बेलापूरच्या दरम्यान असलेल्या सीवूड-दारावे या रेल्वे स्थानकाच्या नावाचा विस्तार केला आहे. त्यामुळे हे रेल्वे स्थानक आता सीवूड-दारावे-करावे या नावाने ओळखले जाणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने स्थानकाच्या नामविस्ताराचे परिपत्रक काढल्यामुळे सीवूड-दारावे स्थानकातील सर्वच नामफलकावर आता सीवूड-दारावे-करावे हे नाव झळकणार आहे.
हार्बर रेल्वे मार्गावर लोकलगाड्यांची वाहतूक सुरू झाल्यानंतर सीवूड-दारावे रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. पूर्वी या भागातील रहिवाशांना नेरुळ स्थानकात उतरून रिक्षाने प्रवास करावा लागत होता. या रेल्वे स्थानकाचे काम २००३ मध्ये सुरू होऊन स्थानकाचे २००५ तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते झाले होते. तेव्हापासून माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी या रेल्वे स्थानकाच्या नावाचा विस्तार करून त्यामध्ये करावे गावाचाही समावेश करण्यात यावा अशी मागणी लावून धरली होती. म्हात्रे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
रेल्वे स्थानकाच्या नावात विस्तार झाला असला तरी या स्थानकाच्या अंकातील कोडमध्ये कोणताही बदल झालेला नाही. अक्षरातील कोड मात्र बदलला आहे. पूर्वी अक्षरातील कोड एसडब्ल्यूडीव्ही असा होता, आता तो एसडब्ल्यूडीके असा असणार आहे.





























































