मध्य रेल्वेच्या टीसींची ‘करोडपती कामगिरी’… कोरोनाकाळात फुकट्या प्रवाशांकडून एक कोटीची दंडवसुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कोरोनाकाळात आतापर्यंतचा सर्वाधिक 200 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. या दंडवसुलीत वैयक्तिक कामगिरी करीत आतापर्यंत तिघा जणांनी एक कोटीचा दंड वसूल करीत मध्य रेल्वेच्या तिजोरीत भर टाकली आहे.

या आर्थिक वर्षांत टीसी मोहम्मद शम्स चांद यांनी कोरोना निर्बंधांच्या काळात विनातिकीट प्रवाशांकडून एक कोटी रुपयांचा दंड वसूल करीत मध्य रेल्वेच्या ‘वन करोड क्लब’मध्ये सहभागी होण्याचा पहिला मान पटकावला होता. त्यानंतर टीसी अभिषेक कुमार सिन्हा यांनी एक कोटीचा दंड वसूल केला तर आता टीसी सुनील नैनानी यांनी 1.04 कोटीचा दंड वसूल करीत तिसरा क्रमांक पटकवला आहे.

टीसी मोहम्मद शम्स यांनी 13,472 विनातिकीट प्रवाशांकडून एक कोटीचा दंड वसूल केला आहे. त्यानंतर टीसी अभिषेक कुमार सिन्हा यांनी 1 एप्रिल 2021 ते 23 मार्च 2022 या काळात 13,200 विनातिकीट प्रवाशांकडून 1.03 कोटीचा दंड वसूल केला आहे. तर आता टीसी सुनील नैनानी यांनी 1 एप्रिल 2021 ते 27 मार्च 2022 या काळात विनातिकीट प्रवाशांकडून 1.04 कोटीचा दंड वसूल केला.