सीएसएमटीवर समुद्रकिनारा अन् डॉल्फीनसोबत सेल्फीची मजा, बच्चे कंपनीसाठी मॅजिक मिररची सोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर लांबपल्ल्याच्या गाडय़ा सुटणाऱ्या फलाटावर आता बच्चे कंपनीसाठी ‘मॅजिक मिरर’ लावण्यात आला आहे. या मॅजिक मिररमध्ये आभासी जगतात आपण गेल्याचा भास होतो. तसेच साईड स्क्रिनवर रेल्वेचे वेळापत्रकही दिसते. सध्या हा स्क्रिन ट्रायल मोडवर असून त्यात समुद्रकिनारा आणि लाटांमध्ये उसळणाऱ्या डॉल्फीनसोबत आपली छबी पाहण्याची सोय आहे. भविष्यात या स्क्रिनवर विविध प्रतिमा दाखवून आभासी जगताची सफर केल्याचा आनंद प्रवाशांना मिळणार आहे.

सीएसएमटीच्या लांबपल्ल्याचा फलाट क्र. 11 व 12 दरम्यान ही भव्य ऑगर्मेटेड रिऍलिटी (एआर) स्क्रिन बसविण्यात आली असून मे. टाइम्सलाईडर टुरिजम प्रा.लि. कंपनीने पाच वर्षांकरिता 50 लाखांचे उत्पन्न मध्य रेल्वेला मिळवून दिले आहे. यात मनोरंजनासोबतच रेल्वेचे वेळापत्रक, जनजागृती संदेश तसेच जाहिराती दाखवून कंपनी उत्पन्न कमविणार असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

स्लिपिंग पॉडमध्ये दोन दिवसांत 60 प्रवाशी

सीएसएमटी लांबपल्ल्यांच्या फलाट क्र. 18च्या दिशेने जाताना एअरपोर्टप्रमाणे हायफाय कॉनकोर्स तयार करण्यात आला असून त्यात ‘नमह’ नावाने नवीन स्लिपिंग पॉड हॉटेल बांधल्याने मंत्रालयापासून विविध सरकारी कार्यालयाच्या कामाला येणाऱया प्रवाशांना त्यांची मेल-एक्सप्रेस येईपर्यंत अवघ्या पाचशे रुपयांत (12 तास) तात्पुरत्या निवासाची प्रशस्त सोय झाली आहे. दोन दिवसांत 60 टक्के भारमान असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी नॉन फेअर रेव्हेन्यू अंतर्गत असलेल्या या दोन्ही उपक्रमांना आज भेट दिली.