
जेवण केल्यानंतर मैत्रिणीसोबत सोसायटीलगत रस्त्यावर शतपावली करताना दुचाकीस्वार चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या गळ्यातील 30 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास सॅलसबरी पार्कमध्ये घडली. याप्रकरणी शांतीदेवी जैन (वय 62) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
शांतीदेवी आणि त्यांची मैत्रिणी जेवण केल्यानंतर इमारतीलगतच्या रस्त्यावर शतपावली करत होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी शांतीदेवी यांच्या गळ्यातील 30 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले. त्यांनी आरडाओरडा करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ तपास करीत आहेत.
कात्रजमधील घरफोडीत 1 लाखांचे दागिने लंपास
कात्रजमधील गुजरवाडीत चोरट्यांनी जुन्या घरामध्ये शिरून 96 हजारांचे दागिने आणि 12 साड्या चोरून नेल्या. ही घटना दोन दिवसांपुर्वी घडली आहे. याप्रकरणी त्रिशुल सुभाष सुपनेकर (वय 38) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.



























































