बचतीचे शत्रू

>> चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार

आपले जसे शत्रू असू शकतात तसेच बचतीचे पण शत्रू असतात बरं का? हे शत्रू आपल्याला काही केल्या आपली बचतच होऊ देत नाहीत. बचत न होणे हा खूपच गांभीर्याचा विषय आहे. आज कमवा आणि आज खा. म्हणजे आयुष्यभर कमवत राहणे क्रमप्राप्त आलेच.

आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे. यामधली छोटी स्टेशन म्हणजे आपले दैनंदिन खर्च व मोठी जंक्शन म्हणजे कालांतराने येणारे मोठे खर्च. या खर्चांमध्ये मुलांची शिक्षणे, त्यांचे लग्न, आपली येणारी निवृत्ती इत्यादींचा समावेश होऊ शकतो. आज असलेली किंमत महागाईच्या दराप्रमाणे वाढतच जाते व आज लहान वाटणाऱया खर्चांचा मोठा फुगा तयार होतो. आपणच विचार करा, जर आपण पैसे वाचवलेच नाही तर भविष्यातील तरतुदींसाठी निधी कसा उभा राहील?

मग त्यावेळी फक्त कर्ज काढण्याशिवाय पर्यायच उरणार नाही आणि कर्जासाठी आपण पात्र नसू तर इतरांच्या तोंडाकडे आशेने पाहण्याशिवाय पर्याय उपलब्ध राहणारच नाही. सन्मानाने जगायचं की मिळालेल्या दानावर जगायचं ही निवडही आपल्यालाच करावी लागेल.
बचतीच्या ज्या शत्रूंचा मी उल्लेख केला ते गनिमी काव्याने लढत असतात. कधी ते व्रेडिट कार्डच्या रूपाने आपले कर्ज वाढवतात तर कधी मनाला भुरळ घालून जास्त खर्च करायला भाग पाडतात. दिवाळीसारख्या सणासुदीला हा शत्रू जरा जास्तच डोपं वर काढतो. अशाप्रकारे बचत करायचे आपले सर्व मनसुबे हे शत्रू हाणून पाडतात. शेवटी आपण हताश मनाने बचत करू शकत नाही हे मान्य करू लागतो.
खऱया अर्थाने जर बचतीचा शत्रू कोण असेल तो म्हणजे आपली उत्पन्न कमविल्यावर पहिल्यांदा खर्च करायची सवय.

उत्पन्न कमवायचं आणि खर्च करत सुटायचं, पण मला सांगा, खर्चावर आपले काय नियंत्रण आहे? जेवढा करू तेवढा कमीच. दहा हजार मासिक उत्पन्न असेल तरीही खर्च होईल आणि दहा लाख मासिक उत्पन्न असेल तरीही खर्च होईल. कारण जसे आपण जास्त उत्पन्न कमवतो तसे आपले राहणीमान बदलत जाते. आधी पायी प्रवास, मग बस, मग रिक्षा, मग दुचाकी, मग साधी चारचाकी, मग मर्सिडीज, दिवसादिवस उत्पन्नानुसार राहणीमान बदलतेच व खर्च हे वाढतंच राहतात. त्यामुळे बचत होणं हेच मुळी आव्हान बनून जातं.

त्यामुळे बचत करायची असेल तर आपल्याला व्यवहाराचं समीकरण बदलावं लागेल. उत्पन्नवजा खर्च हे समीकरण बदलून उत्पन्नवजा बचत असं करावं लागेल. कारण बचत पहिल्यांदा केली तरच खर्चावर नियंत्रण येईल. जर उत्पन्न 30 ते 40 टक्के जर कमी मिळालं असतं तर मिळालेल्या उत्पन्नात आपण आपले खर्च भागवले असतेच ना? कारण जेवढा पैसा हाती येईल तेवढा पैसा खर्च होईल म्हणून बचत आधी, खर्च नंतर.

ही बचतीची मानसिकता बदलायची असेल तर बचतीला आपला अतिशय महत्त्वाचा खर्च मानायला सुरुवात करा. कारण आपल्या दैनंदिन महत्त्वाच्या गरजांसाठी आपण कधीही तडजोड करत नाही त्याचप्रमाणे बचत पहिल्यांदा करण्यासाठी कधीही तडजोड करू नका. कारण हीच बचत आपणास भविष्यात मानसन्मान मिळवून देईल. बचत विभागून कमी, मध्यम व लांब पल्ल्याच्या उद्दिष्टांसाठी केल्यामुळे जेव्हा आपल्या गरजेच्या गोष्टी समोर येतील त्यावेळी आपला निधी आपली गरज भागवायला तयार असेल. यामुळे आपल्याला जी मिळेल ती म्हणजे मानसिक शांतता आणि आयुष्यात खऱया अर्थानं तीच महत्त्वाची आहे.

आपण जर हा लेख वाचत असाल व आपण उत्पन्न कमावल्यावर जर आधी खर्च करीत असाल तर जागरूक होऊन आपलं समीकरण जरूर बदला. जसं जसं आयुष्य पुढं जाईल तसं आपल्याला बदललेल्या समीकरणाचे फायदे नक्कीच अनुभवायला मिळतील. वेळ निघून गेल्यावर निराश होण्यापेक्षा आजच बचतीचे शत्रू ओळखा व आजच त्यांचा बंदोबस्त करा.
समर्थ रामदासांनीही म्हटले आहे, केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे.

…तर वेळ निघून गेलेली असेल
काही जण आपल्या आयुष्यात खूप उत्पन्न कमवतात, पण बचत काहीच करीत नाहीत. पण आयुष्याच्या मध्यावर किंवा उत्तरार्धात जेव्हा त्यांच्या लक्षात येते की, मी किती पैसे कमवले व आज माझ्याकडे काहीच शिल्लक नाही त्यावेळी मात्र ते बिथरतात, उद्विग्न होतात. पण आयुष्यातली वेळ निघून गेलेली असते.