चंद्रपूर – सर्जा राजाच्या बैलगाडीतून आली लग्नाची वरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नटलेले सर्जा, राजा, सजलेली बैलबंडीची रांगच रांग. त्यात सनई, डफाचा सुरात येणारे वऱ्हाडी. आजचा आधुनिक युगात क्वचित दिसणारं हे चित्र अनेकांना सुखावून गेलं. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात आलेली ही लग्न वरात लक्षवेधी ठरली.

आजच्या आधुनिक युगात लग्न सोहळा म्हणजे आनंदाला आलेलं उधाण. खास करून युवक, युवती आणि चिमुकल्यासाठी मोठी पर्वणीच असते. लग्न सोहळ्यातून आपली श्रीमंतीचा देखावा करण्याची जणू पैज लागलेली असते. आलिशान वाहनाची मोठी रांग, भव्यदिव्य मंगलकार्यालय डीजे, बँडच्या तालावर थिरकत येणारे वऱ्हाडी. मात्र राजुरा शहरात यापेक्षा फारच वेगळं चित्र दिसलं. गावावरून बैलगाडीने अख्खं वऱ्हाड विवाह स्थळी पोहचलं.

राजुरा तालुक्यातील माचरा या गावातील सुभाष लांडे यांचा मुलगा शरद याचा विवाह राजुरा येथील वीरूर स्टेशन येथील बंडू निमकर यांची मुलीशी जुळला. राजुरा येथील धनोजे कुणबी सभागृहात रविवारी हा विवाह पार पडला. लांडे यांनी आपल्या मुलाची लग्न वरात बैलगाडीने आणली. राजुरा शहरातील मार्गाने आलेली ही वरात वरात बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.