चंद्रपूर – गणेशोत्सवावरही कोरोनाचे संकट, अद्याप एकाही मंडळाकडून नोंदणी नाही

694

कोरोना संकटामुळं विघ्नहर्त्याचं आगमनही प्रभावीत झालं असून, गणेशोत्सव कसा साजरा करायचा, असा प्रश्न मंडळांना पडलाय. त्यामुळं एकाही मंडळाने अजूनपर्यंत नोंदणी केलेली नाही.

गणेशोत्सव म्हणजे आनंदोत्सव. हा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. मात्र तो साजरा करावा की नाही, करायचा तर कशारीतीनं, असे अनेक प्रश्न मंडळांपुढे उभे ठाकले आहेत. त्यामुळं दरवर्षी दिसणारी तयारी यावेळी कुठंच दिसत नाही. चार फुटाच्या वर मूर्ती नको, मंडप छोटं असावं, गर्दी होऊ नये, याची काळजी घ्यावी, कोरोनासंदर्भातील सर्व नियम पाळावे, असे दंडक राज्य शासनानं पाळून दिल्यानं मंडळ त्यानुसार नियोजन करीत आहेत.

भक्तांना आकर्षित करणारे देखावे, यावर्षी करायचे नसल्यानं गर्दी आपोआपच कमी होईल, अशी शक्यता गृहीत धरण्यात आली. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता उत्सव आयोजनात फार उत्साह दिसत नाही. याचा चांगलाच फटका मूर्तिकारांना बसलाय. मोठ्या मूर्तींची एकही मागणी आलेली नाही. तीन ते चार फुटांच्या मूर्ती तेवढ्या विकायच्या असून, त्यातही मागणीत घट झालेली. त्यामुळं लावलेला पैसा निघणेही कठीण झालं आहे.

कोरोनाच्या संकटामुळं उत्सव साजरे करायचे नाहीत, असा नियम असल्यानं यावर्षी मंडळांची नोंदणीच झालेली नाही. गतवर्षी सुमारे दोन हजार मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे अशी नोंदणी केली. मात्र यावेळी एकही अर्ज आलेला नाही. मुळात नोंदणी करण्यासाठी कोणतेही बंधन नाही. राज्यातील सर्वातमोठ्या सार्वजनिक उत्सवावर कोरोनामुळं आलेलं संकट लवकर दूर होवो, एवढी प्रार्थना आपण विघ्नहर्त्याला करू शकतो. तेवढंच भक्तांच्या हाती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या