
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या कापणगाव येथील महामार्गावर हा अपघात घडला. या अपघातात 3 जण गंभीर, तर 1 किरकोळ जखमी झाला आहे. गंभीर जखमींना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर किरकोळ जखमीला राजुरा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे.
अपघातग्रस्त रिक्षा राजुरा शहराकडून खामोना-पाचगाव येथे जात होती. ट्रक गडचांदूर येथून राजुऱ्याकडे येत होता. कापणगाव येथे सर्विस रोडवरून महामार्गावर रिक्षा चढताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात रिक्षाचालकासह तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. प्रकाश मेश्राम, रवींद्र बोबडे, शंकर पिपरे आणि वर्षा मांदाडे अशी मृतांची नावे आहेत.