
चंद्रपूर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी पिकांचं नुकसान होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. या पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झालं असून वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोम्भूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा गावात शुक्रवारी सकाळी शेतातून परत येत असताना वीज पडून राम्मन्नी देवलोहट वय (55) यांचा मृत्यू झाला.
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळला. गेले दोन दिवस ढगाळी वातावरण तसेच गारवाही होता. ऐन थंडीच्या दिवसात पाऊस आल्याने पिकांवर मोठं संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस बरसल्याने कोरडे नाले वाहू लागल्याचं चित्र बघायला मिळत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील रब्बी पीक हरभरा, गहू, मूग, तूर, लाख यांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. अजूनही पावसाची रिपरिप सुरू असून, शुक्रवार दुपारपर्यंत वातावरण असंच राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.































































