चांगले काम करूनही भाजपने मला तिकीट दिले नाही – बावनकुळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपमध्ये तिकिटांचा निर्णय केंद्रीय समिती घेते; त्यामुळे कोणाला तिकीट द्यायचे हा त्यांचा निर्णय असतो. मी 15 वर्षे आमदार, ऊर्जामंत्री म्हणून चांगले काम करूनही पक्षाने मला लढू नका, असे सांगितले होते. भाजपमध्ये काहीही घडू शकते आणि ते कोणालाही तिकीट देऊ शकतात, अशी खदखद प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात संघर्ष टोकाला गेल्याने बावनकुळे मध्यस्थीच्या प्रयत्नात आहेत. काल त्यांच्याशी चर्चा करून दोघांत मतभेद आहेत; पण मनभेद नाहीत, अशी सारवासारव बावनकुळे यांनी केली.

खासदार अमोल कोल्हे यांच्या आक्रोश मोर्चावर बावनकुळे यांनी टीका केली. आता त्यांना आक्रोश केल्याशिवाय पर्याय नाही, असे सांगत अडीच वर्षांच्या काळात काय काम केले, हेही या मोर्चात सांगा, असा टोला त्यांनी लगावला. सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी नेहमीच अनुपस्थित असतात, याकडे लक्ष वेधल्यावर ‘पक्ष सगळ्यांच्या कामाचे प्रगतिपुस्तक बघतो,’ असे बावनकुळे म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष असून मला निमंत्रण नाही

n राम मंदिराच्या निमंत्रणावरून बावनकुळे म्हणाले, ‘राम मंदिर उभारण्यासाठी देशातील लाखो लोकांनी आपली हयात घालवली. अशा लोकांना 22 तारखेचे निमंत्रण मिळाले असेल. कोणाला बोलवायचे हा न्यासाच्या अधिकार आहे. मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष असूनही मलाही अजून निमंत्रण दिले नसल्याची खंत व्यक्त करीत दर्शन घेण्यासाठी नंतरही जाऊ शकतो,’ अशी मखलाशी बावनकुळे यांनी केली.