चांद्रयान झेपावले, ‘इस्रो’ची अभिमानास्पद कामगिरी

68

सामना ऑनलाईन, श्रीहरीकोटा

हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने सोमवारी ठीक 2 वाजून 43 मिनिटांनी इतिहास रचला. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ‘चांद्रयान-2’ यशस्वीरीत्या अवकाशात झेपावले. कोटय़वधी हिंदुस्थानींनी हा अभिमानास्पद क्षण डोळय़ात साठवला. या कामगिरीबद्दल शास्त्रज्ञांसह देशभरातील जनतेने एकच जल्लोष साजरा केला. दरम्यान, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे यान पोहोचणार आहे. अशी कामगिरी करणारे जगातील हे पहिलेच यान असेल.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह सर्व पक्षांच्या मुख्यमंत्री, नेत्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांने अभिनंदन केले आहे. लोकसभा आणि राज्यसभेतही शास्त्रज्ञांचे खास अभिनंदन करण्यात आले. जीएसएलव्ही मार्क-3 द्वारे चांद्रयान-2चे यशस्वी प्रक्षेपण झाले. तब्बल 43.43 मीटर उंचीच्या जीएसएसव्ही मार्क-3ला ‘बाहुबली’ हे नाव देण्यात आले. तीन स्तरावरील हे रॉकेट आहे. अवघ्या 16 मिनिटे 20 सेकंदात हे चांद्रयान-2 पृथ्वीच्या कक्षेत पोहोचले. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी चांद्रयान-2च्या यशस्वी प्रक्षेपणाची माहिती दिली. 15 जुलैला या यानाचे प्रक्षेपण होणार होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे प्रक्षेपण रोखण्यात आले होते. आजच्या प्रक्षेपणाकडे जगभरातील हिंदुस्थानींचे डोळे लागले होते. मात्र, इस्रोच्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांनी संपूर्ण स्वदेशी बनावटीचे चांद्रयान-2 मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला. इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.

स्त्री जातीच्या शिरपेचात मानाचा तुरा!

संपूर्ण हिंदुस्थानी बनावटीचे मानवरहित चांद्रयान-2 या मोहिमेच्या नेतृत्व करणाऱ्या वनिता मुथय्या व रितू करिधल या महिला संशोधकांचे कोटी-कोटी अभिनंदन. पृथ्वी ते चंद्रापर्यंतचे लाखो किलोमीटरचे  अंतर कापून 7 सप्टेंबरला हे चांद्रयान-2 चंद्रावर उतरणार असून जगातल्या प्रत्येक क्षेत्रात गगनाची उंची गाठणाऱ्या महिलांनी खगोलशास्त्रातही पुन्हा एकदा यश संपादन करून स्त्री जातीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे- सुमन अगरवाल, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस

आपली प्रतिक्रिया द्या