…तर दिवाळीत झेपावणार ‘चांद्रयान-2‘

25

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

अंतराळात नवा इतिहास रचण्याचा निर्धार केलेल्या ‘इस्रो’ने तांत्रिक बिघाड दूर करून गुरुवारपर्यंत ‘चांद्रयान-2’चे प्रक्षेपण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, मात्र या प्रयत्नांतही यश न आल्यास ऑक्टोबरमध्ये म्हणजेच दिवाळीच्या आसपास ही मोहीम फत्ते केली जाणार आहे.

‘चांद्रयान-2’ सोमवारी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावणार होते. इस्रोने मोहिमेची संपूर्ण तयारी केली असतानाच प्रक्षेपण वाहनामध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडाने उड्डाणाचा ब्रह्ममुहूर्त साधता आला नाही. इस्रोने 18 जुलैपर्यंत बिघाड दूर करून यानाचे उड्डाण करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यात यश न आल्यास पुढील तीन महिन्यांसाठी ही मोहीम थांबवली जाणार आहे. इस्रोला पुढील ‘लाँच विंडो’ ऑक्टोबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे. मोहीम रद्द केलेली नाही. लवकरच प्रक्षेपणाची नवी तारीख घोषित केली जाईल, अशी माहिती इस्रोच्या सूत्रांनी दिली. ज्यावेळी पृथ्वी आणि चंद्रामधील अंतर कमी असते आणि रॉकेटची दुसऱया उपग्रहांना धडकण्याची शक्यता खूप कमी असते त्यावेळी त्या वेळेला ‘लाँच विंडो’ म्हटले जाते.

इस्रोची भरभरून प्रशंसा

‘चांद्रयान -2’चे प्रक्षेपण तांत्रिक बिघाडामुळे थांबवले. यामुळे प्रक्षेपण पाहण्यासाठी आलेल्या लोकांची भले निराशा झाली, मात्र मोहिमेतील सक्रियता आणि वेळीच निर्णय घेतल्याबद्दल इस्रोची भरभरून प्रशंसा होऊ लागली आहे. घाई करून मोहिमेला संकटात टाकण्याऐवजी प्रक्षेपण रद्द करण्याचा इस्रोचा निर्णय कौतुकास्पद आहे, अशी दाद काही अंतराळ शास्त्रज्ञांनी दिली.

‘काही दिवसांचा विलंब’ अधिक चांगला

‘चांद्रयान-2’च्या प्रक्षेपणाच्या एक तास आधी इस्रोला आपल्या ‘बाहुबली’ रॉकेटमधील तांत्रिक बिघाडाची कल्पना आली. सोशल मीडियावर लोकांनी इस्रोची प्रशंसा करताना म्हटले की, ‘कधीच नाही’पेक्षा  ‘काही दिवसांचा विलंब’ अधिक चांगला.

आपली प्रतिक्रिया द्या