अभिषेक भटपल्लीवार । चंद्रपूर
चंद्रपूर येथील कार्मेल अकॅडमी कॉन्व्हेंटमधे तिसरीत शिकणाऱ्या मुलाचा शाळेच्या बसखाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. दुपारी अडीच वाजता शाळा सुटल्यानंतर बसमध्ये बसण्यासाठी मुलं धावत आली. यावेळी सर्व मुलं बसमध्ये बसल्याचे चालकाला वाटले व त्याने बस मागे घेतली. त्यामुळे बसच्या मागेच उभ्या असलेल्या विद्यार्थ्यावर ही बस चढली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यशराज चांदेकर (9) असे त्याचे नाव आहे.
यशराज उर्जानगर कॉलनीत राहत होता. दरम्यान अपघाताचे वृत्त समजताच शिवसेना कामगार सेना प्रमुख जयदीप रोडे व नगर सेवक सुरेश पचारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संतप्त जमावाने रास्तारोको करून मुलाच्या कुटुंबीयांना मदतीची मागणी केली. शाळेजवळ होणारी वाहतूक कोंडी दूर करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.



























































