मदतीच्या बहाण्याने जेष्ठ नागरिकाची 32 हजारांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याच्या बहाण्याने कार्ड बदली करून 32 हजार रुपये काढून फसवणूक करण्यात आली आहे. मगरपट्टा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी 65 वर्षांच्या जेष्ठ नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे मगरपट्टा येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शनचे अकाउंट आहे. सात सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ते पेन्शनचे पैसे काढण्यासाठी बँकेच्या एटीएममध्ये गेले होते. त्यांनी एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण, पैसे निघाले नाही. त्यावेळी पाठीमागे उभ्या असलेल्या व्यक्तीने त्यांना पैसे काढून देण्याचा बहाणा केला. त्यांच्याकडून एटीएमकार्ड घेऊन हातचलाखीने दुसरेच कार्ड एटीएममध्ये टाकले. त्यानंतर तक्रारदार यांना पिन क्रमांक टाकायला सांगितला.

तक्रारदार पिन क्रमांक टाकत असताना त्याने पाहिला. पण, तरीही पैसे निघाले नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांना आरोपीने दुसरेच एटीएम कार्ड परत दिले. तक्रारदार दुसरेच एटीएम कार्ड घेऊन गेले. त्यानंतर आरोपीने त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून त्यांच्या बँक खात्यातून 32 हजार रूपये काढले. खात्यातून पैसे कमी झाल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.