चार्जरशिवाय आयफोन देणे पडले महागात, ऍपल कंपनीला 14 कोटींचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चार्जरशिवाय आयफोनची विक्री करणे ऍपल कंपनीला महागात पडले आहे. याप्रकरणी ऍपल कंपनीला ब्राझीलमधील ग्राहक संरक्षण संस्थेने ( प्रोकॉन- एसपी) 14 कोटींचा दंड ठोठावला आहे.

ऍपलने गेल्या वर्षी आयफोन 12 लाँच केला होता. नवीन मॉडेल चार्जरसह येणार नाही. तसेच बॉक्समध्ये तुम्हाला इयरबड्सही मिळणार नसल्याचे कंपनीने म्हटले होते. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी चार्जर न देण्याची भूमिका कंपनीने मांडली होती. चार्जरमुळे निर्माण होणारा ई-कचरा कमी करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी म्हटले. पण त्यांच्या या निर्णयामुळे पर्यावरणाचा फायदा होतोय, हे सिद्ध होऊ शकले नाही, असा दावा प्रोकॉन- एसपीने केला आहे.

ऍपलने मोबाइल हँडसेटसह चार्जर दिला नाही. तरीदेखील फोनची किंमत कमी का केली नाही, असा सवालही प्रोकॉन- एसपीने उपस्थित केला. युजर्सनी आयओएस अपडेट केल्यानंतर त्यांच्या फोनमध्ये अडचणी येऊ लागल्या आहेत. ऍपलने या समस्येबाबतही युजर्सची कोणतीही मदत केली नाही, असेही प्रोकॉन- एसपीने म्हटले.