
दीपावलीचे शुभ पर्व आपला दरवाजा ठोठावत असतानाच देशातील कलाकारांच्या आणि कारागिरांच्या कल्पकतेला नवे पंख लाभल्याचे चित्र देशात आहे. छत्तीसगढ राज्यातील बस्तरच्या एका कुंभाराने चक्क 24 तास पेटत राहील असा मातीचा सुंदर दिवा बनवला आहे.
दिवाळीच्या दीपोत्सवात आता तुम्हाला वारंवार दिव्यात तेल घालण्याची गरज लागणार नाही असा विश्वास या कल्पक कुंभाराने व्यक्त केला आहे. अशोक चक्रधारी असे या बस्तरच्या कोंडगावमधील कुंभाराचे नाव आहे.
चक्रधारी याने साकारलेल्या नव्या दिव्यात वारंवार तेल घालण्याची गरज नाही. एकदाच त्यात पुरेसे तेल टाकले की ते तेल दिवा पेटवल्यावर आपोआप वातीकडे वाहत जाईल अशी दिव्याची रचना आहे.
चक्रधारीने 2019पासून या नव्या मॅजिक लॅम्पवर काम करायला सुरुवात केली होती. त्यासाठी त्याने यु टय़ूबवर अनेक मातीच्या दिव्यांच्या रचनेचा अभ्यास केला. अखेर त्याच्या चाकातून आणि भट्टीतून त्याने एक आगळावेगळा दिवा विकसित करण्यात यश मिळवले. आपल्या या दिव्याला त्यानेच मॅजिक लॅम्प असे नाव दिले आहे.
नवे कल्पक तंत्र वापरणे हाच ध्यास
छत्तीसगडच्या 62 वर्षीय अशोक चक्रधर या कुंभाराला नव्या मातीच्या कलाकृती साकारण्याचा छंद आहे. त्यामुळेच त्याने युटय़ुबवर मातीच्या दिव्यांचा अभ्यास करून सलग 24 तास प्रज्वलित राहू शकणार मातीचा दिवा विकसित केला आहे.
नवे कल्पक तंत्र वापरणे हा आपला छंद असल्याचे चक्रधर म्हणतो. त्याच्या 24 तास जळणाऱ्य़ा मातीच्या दिव्याला आतापासूनच मोठी मागणी येऊ लागली आहे. 24 तास जळणाऱ्य़ा या मॅजिक लॅम्पचा किती पुरवठा चक्रधर करू शकतो हे लवकरच आपल्याला कळणार आहे.
























































