
श्री विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज होत आहे. तो रोखण्यासाठी रासायनिक प्रक्रिया करण्याबाबत शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे मंदिर समितीने परवानगी मागितली होती. त्यानुसार विधी न न्याय विभागाकडून याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार परिषद, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक महाराज मंडळी यांच्या संघटनांसमवेत एक संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. त्यानुसार रासानिक लेप करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. रासानिक लेपन केल्यानंतर चरणदर्शन बंद ठेवावे लागणार आहे. माघ वारीच्या अगोदर विठ्ठल मुर्तीच्या चरणांवर रासानिक लेपन करावे लागणार आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, लाखो वैष्णवांचा विधाता असणाऱ्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येतात. वर्षभरातील चार मोठ्या यात्रांमध्ये येणारे एकूण भाविक पाहता वर्षाकाठी सुमारे सव्वा कोटीहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे एकमेव असे मंदिर आहे, जिथे भाविकांना चरणस्पर्श दर्शन घेता येते. त्यामुळे दररोज हजारो भाविकांकडून चरणस्पर्श होत आहे. यामुळे विठ्ठल मूर्तीच्या चरणाची झीज होत आहे. चरणाची होणारी झीज थांबवण्यासाठी एकमेव उपाय म्हणून रासायनिक लेप (एपोक्सी लेप) करण्यात येतो. विधी व न्याय विभागाने परवानगी दिल्यास लेपन करण्यात येते. मुर्तीच्या चरणाची झीज होत असल्याने वज्रलेप करावा लागणार असून करण्यात येणारा रासायनिक लेप हा पाचवा असणार आहे.
दर पाच वर्षानी श्री विठ्ठलाच्या मुर्तीच्या चरणावर रासानिक लेप करण्याची आवश्यकता असल्याचे पुरातत्व विभागाने सुचवले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या सुरक्षितता व दीर्घकालीन संवर्धनाच्या दृष्टीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्यावतीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण छत्रपती संभाजीनगर यांच्याशी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तींची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर लेखी अहवाल मंदिर समितीकडे सादर केला आहे. तर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाकडून प्राप्त झालेल्या अहवालास श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची मंजुरी घेऊन, पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सदर अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. तो अहवाल मंदिर समितीला मिळाला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
विधी व न्याय विभागाने श्री विठ्ठल मुर्तीच्या चरणावर रासायनिक प्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार मंदिर समितीकडून याची तातडीने दखल घेवून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, सल्लागार परिषद, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक महाराज मंडळी यांच्या संघटनांसमवेत लवकरच एक संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित असतील. या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, की कशा पध्दतीने ही प्रक्रिया करायची आहे. किती दिवस पदस्पर्श दर्शन बंद ठेवावे लागेल. याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
-राजेंद्र शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर


































































