
ऑनलाइन औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी देशभरातील केमिस्ट दुकानदारांनी आज कडकडीत बंद पाळला होता. राज्यातील 1 लाख 35 हजार तर देशभरातील साडेबारा लाख दुकाने बंद होती. हा केवळ लाक्षणिक बंद होता. सरकारने ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी न घातल्यास जुलैपासून बेमुदत बंद केला जाईल, असा इशारा ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ ड्रगिस्ट (एआयओसीडी) या संघटनेने दिला आहे.
ऑनलाइन औषध विक्री वाढल्याने केमिस्टवाल्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. तसेच प्रिस्क्रिप्शनशिवाय ही औषध विक्री होत असल्याने रुग्णांच्या जिवाचा धोकाही वाढला असल्याचा दावा करत ‘एआयओसीडी’ने बंदची हाक दिली होती. कोरोना काळात ऑनलाइन औषध पुरवठय़ासाठी फूड डिलिव्हरी कंपन्यांना औषध विक्रीची सवलत देण्यात आली होती, तिचा आता गैरवापर होत आहे. त्यामुळे ही सवलत मागे घेण्याची मागणी ‘एआयओसीडी’ने केली होती.
‘एआयओसीडी’चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी आजचा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला. देशभरात सुमारे 15 लाख केमिस्ट आहेत. त्यातील साडेबारा लाख केमिस्ट दुकाने बंद होती. आपात्कालीन परिस्थितीत औषधे उपलब्ध व्हावीत म्हणून रुग्णालयांमधील तसेच रुग्णालयांबाहेरील काही ठराविक केमिस्ट बंद काळातही उघडी ठेवण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. ई-फार्मसीसाठी कठोर नियम बनवावेत जेणेकरून प्रिस्क्रिप्शनशिवाय आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची ऑनलाईन विक्री होणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले.


























































