
‘पाच पैशांचे नाणे दाखवा आणि भरपेट बिर्याणी खा’ अशी भन्नाट ऑफर चेन्नईच्या सेल्लूर येथील एका हॉटेल मालकाने ग्राहकांना दिली होती. नवीन दुकानाच्या प्रमोशनसाठी दिलेली ही ऑफर हॉटेल मालकाच्या अंगलट आली आहे. पाच पैशांचे नाणे घेऊन दुकानाबाहेर शेकडोंची गर्दी जमा झाली. त्यामुळे हॉटेल मालकाची चांगलीच दमछाक झाली.
सध्याच्या महागाईच्या जमान्यात मार्पेटला गेल्यावर 500 रुपये कधी संपतात हेदेखील कळत नाही. मात्र सेल्लूर भागातील एका हॉटेल मालकाने अवघ्या पाच पैशांमध्ये भरपेट बिर्याणी खाण्याची ऑफर दिली. सध्याच्या जमान्यात क्वचितच एखाद्दुसऱयाकडे पाच पैशांचे नाणे असेल असे हॉटेल मालकाला वाटले. मात्र त्याचा अंदाज चुकला अन् कोरोनाचे संकट विसरून लोकांनी बिर्याणी खाण्यासाठी दुकानाबाहेर एकच गर्दी केली. मास्क, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. लोकांचा गोंधळ वाढू लागल्यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेवटी पोलिसांना बोलवावे लागले. अपेक्षेपेक्षा जास्त लोक आल्याने बिर्याणी झटपट संपली. त्यामुळे मालकालाही दुकानाचे शटर लवकर बंद करावे लागले. 5 पेशांचे नाणे देऊनही बिर्याणी न मिळाल्याची तक्रार नागरिकांनी बंदोबस्तावर आलेल्या पोलिसांकडे केली. या ऑफरमुळे मालकाच्या डोक्याला चांगलाच ताप झाला. भविष्यात तरी ग्राहकांना पुन्हा अशी ऑफर देण्याचे तो धाडस करणार नाही असेच दिसतेय.


























































