
आमच्या आदर्शाचा अपमान झाला, असे काही लोकांचे म्हणणे चुकीचे आहे. कविवर्य कुसुमाग्रजांच्या नावाला विरोध करणे म्हणजे कोह्याला द्राक्ष आंबट अशी तऱहा आहे. नाशिकची द्राक्ष गोड आहेत. शरद सिडलेस तर अधिक गोड आहे, असा टोला संमेलनाध्यक्ष छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हाणला.
साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून छगन भुजबळ बोलत होते. संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे, सहभागी झालेले साहित्यिक, विचारवंत, प्रसारमाध्यमे आणि नाशिककर या सर्वांचेच त्यांनी प्रथम आभार मानले. कोरोनाच्या संकटामुळे संमेलनाला विलंब झाला. संमेलनस्थळाला सावरकरांचे नाव द्यायला लागू नये म्हणून कुसुमाग्रजांचे नाव दिले गेले, आमच्या आदर्शाचा जिथे अपमान होतो तेथे जाणे योग्य नाही, असे सांगून फडणवीस यांनी संमेलनाला येणे टाळले, याचा धागा पकडून भुजबळ म्हणाले की, नियोजनाच्या सुरुवातीलाच संमेलनस्थळाला कविवर्य कुसुमाग्रजनगरी हे नाव देण्याचे निश्चित झाले होते. संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्तीपर गीते गायली गेली. कवीमंचालाही त्यांचे नाव दिले होते. सावरकर आणि कुसुमाग्रज हे दोघेही नाशिकचेच आहेत, त्यांच्याबद्दल कायमच आदर आहे. पण, कुसुमाग्रजांच्या नावाला विरोध करणे हे कोह्याला द्राक्ष आंबट या म्हणीप्रमाणे आहे.

































































