
महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसावर महाराष्ट्राचा हक्क आहे. पाणीवाटपात ज्या पाण्याचा हिशेब धरला नाही, ते अडवून पश्चिम भागातील पाणी येवला, वैजापूरकडे वळवणार असून, उपलब्ध पाण्यातून योग्यप्रकारे आवर्तनाचे नियोजन करण्यात यावे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले. दरम्यान, गोदावरी उजव्या कालव्यातून रब्बीसाठी एक, तर उन्हाळ्यासाठी तीन आवर्तने देण्याचे आदेश मंत्री भुजबळ यांनी पाटबंधारे विभागाला दिले.
मंत्री भुजबळ म्हणाले, आपल्याला जास्त पाणी मिळण्यासाठी महाराष्ट्राच्या धर्तीवर पडेल त्या पाण्याचा अधिकार महाराष्ट्राचा आहे. मात्र, या ठिकाणी डोंगर अधिक असल्याने हे पाणी गुजरातला वाहून जाते. यासाठी गेल्या 15 वर्षांपासून आपण लढा देत आहोत. वाहून जाणारे हे पाणी गुजरातला न देता हे पाणी महाराष्ट्रात वळविल्यानंतर नाशिक, नगरसह मराठवाडय़ाचा पाणीप्रश्न सुटणार आहे. कालेश्वरम प्रकल्पाप्रमाणे हे पाणी उचलण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. सरकारला कर्ज काढण्याची वेळ आली तरी चालेल; मात्र गुजरातला वाहून जाणारे पाणी महाराष्ट्रात वळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हे पाणी आल्यानंतर कालवा सल्लागार समितीच्या बैठका घेण्याची गरज पडणार नाही. गेल्या पाच वर्षांत कालव्याची दुरुस्ती न झाल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणी सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालय येथे गोदावरी उजवा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे,आमदार माणिकराव कोकाटे राधाकृष्ण विखे-पाटील, आशुतोष काळे, लहू कानडे, सुधाकर रोहम, राजेश परजणे, पद्मकांत कुदळे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आमदार काळे म्हणाले, कालवा सल्लागार समितीची बैठक कोपरगावमध्ये झाल्याने शेतकऱ्यांना आपले प्रश्न मांडता आले. गोदावरी कालव्याचे पश्चिमेकडील पाणी कोपरगाव पूर्वेकडे वळावे, या मागणीचा शासनस्तरावर विचार करण्यात यावा. सध्या मुबलक पाणी उपलब्ध असल्याने रब्बीचे आवर्तन न देता उन्हाळ्यात तीन रोटेशन देण्याचे नियोजन करण्याची मागणी त्यांनी केली.
कोपरगावच्या हक्काचे पाणी कुणीही नेणार नाही
आवर्तन देण्याचा पूर्ण अधिकार स्थानिक आमदारांना देण्यात येत असून, अभ्यास करून पाण्याचा वापर योग्य रितीने करून आवर्तने देण्यात यावीत. कोपरगावच्या हक्काचे पाणी कोणीही नेणार नाही, आरक्षित पाणी पूर्ण क्षमतेने तुम्हाला मिळेल. यामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.
कालव्यांच्या नूतनीकरणासाठी 84 कोटींचा प्रस्ताव
गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी पाटबंधारे विभागाने 84 कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. कालवा सल्लागार समितीचा अध्यक्ष या नात्याने या भागातील कालव्यांचे काम करणे ही माझी जबाबदारी आहे. कालव्यांचे नूतनीकरण व्हावे व टेलपर्यंत पाणी मिळावे, यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन प्रश्न मार्गी लावू. कालव्यातून मोठय़ा प्रमाणावर पाणी चोरी होते. 10 किलोमीटरपर्यंत या पाण्याचा उपसा केला जातो. यावर आवर घालावा, असेही ते म्हणाले.































































