
मंत्रीपदाची संधी देऊन शरद पवारांनी माझा राजकीय पुनर्जन्म केला असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. पुण्यातील समता पुरस्कार प्रदान सोहळय़ासाठी ते आले होते त्यावेळी ते बोलत होते.
माझ्या अडचणीच्या काळात अनेकजण माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. आम्ही आघाडी करताना जनतेच्या, शेतकऱयांच्या, तरुणांच्या, महिलांच्या प्रश्नांवर चर्चा करून एक समान कार्यक्रम ठरविला. तसेच संविधानाच्या उद्देशिकेचा आमच्या एकसूत्री कार्यक्रमामध्ये समावेश केला असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात मी 25 वर्षे काम केले. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत हे पाहून अतिशय आनंद होतोय, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
























































