ऐन लग्नाच्या वेळी दहावीचा पेपर देण्यास गेला नवरदेव, नवरी बघत राहिली मंडपात वाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छतरपूरच्या कल्याण मंडपममध्ये बुंदेलखंड परिवाराने सामूहिक विवाह संमेलनाचे आयोजन केले होते. त्यावेळी एक अनोखी घटना समोर आली. नवरी हातावर मेहंदी लावून मंडपात नवरदेवाची वाट बघत बसली होती. तिचा नवरदेव दहावीची परीक्षा द्यायला गेला. तीन तासांनंतर तो आला आणि मग त्याने तिच्यासोबत सात फेरे घेतले. नव्या जीवनाला सुरुवात करण्यापूर्वी त्याने दहावीची परीक्षा दिली. या विषयाची सध्या पंचक्रोशीत चर्चा आहे.

नवरदेवाचे नाव रामजी सेन आहे. त्याचा विवाह प्रीती सेन हिच्याशी झाला. नवरदेवाची दहावीची परीक्षा आणि लग्न एकाच वेळी आले. रामजी म्हणाला, परीक्षेसाठी मी वर्षभर मेहनत घेतली होती. त्यामुळे तेही काम पूर्ण करणे गरजेचे होते. मी पेपर दिला आणि मला निकाल चांगला येण्याची आशा आहे. आज जीवनाच्या दोन परीक्षा झाल्या. एका शिक्षणाची आणि दुसरी जीवनाची. वधू प्रीती सेन म्हणाली की, मी मंडपात तीन तास नवरदेवाची वाट पाहिली. कारण तो त्याचा दहावीचा पेपर देण्यासाठी गेला होता. पतीने जे केले ते दोघांच्याही भविष्यासाठी चांगले आहे.