छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक भव्य, देखणे, मनाचा ठाव घेणारे व्हावे! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती संभाजी महाराजांचे आयुष्य संघर्षमय असे होते. त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढउतार होते. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे प्रतिबिंब हे स्मारक पाहणाऱयाच्या मनात उमटावे इतके भव्य, देखणे असे स्मारक व्हावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

छत्रपती संभाजी महाराज समाधी विकास आराखडा शिखर समितीची बैठक आज ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी स्मारकासंदर्भातील आराखडा शिखर समितीसमोर सादर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्मारकासंदर्भात वेगवेगळय़ा संकल्पना सादर केल्या जाव्यात. त्या त्रिमितीय स्वरूपात सादर करण्यात याव्यात, असे आदेश दिले. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

असे असेल स्मारक…

भीमा, भामा आणि इंद्रायणी नदीच्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी स्मारक साकारण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली. तुळापूर येथे आठ एकर, तर वढू (बु.) येथे सुमारे चार एकर क्षेत्रावर स्मारक परिसर साकारण्यात येईल.

स्मारक परिसरात भव्य शिल्प, प्रवेशद्वार, इमारत बांधकाम, घाट बांधकाम, संग्रहालय, प्रेक्षागृह, प्रकाश व ध्वनी शो, विद्युतीकरण, सौरऊर्जा पॅनल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अग्निशमन यंत्रणा, संरक्षक भिंत याबरोबरच अस्तित्वातील समाधीचा जीर्णोद्धार आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. याबाबत पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सादरीकरण केले.