वाघनखांसंदर्भातील सरकारच्या त्या निर्णयाला छत्रपती संभाजीराजेंनी म्हटलं वेदनादायी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Sambhajiraje-Chhatrapati

 

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लवकरच ब्रिटनहून मायदेशी परत येणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालं होतं. या संदर्भात महाराष्ट्र सरकार आणि ब्रिटनमध्ये एक करार करण्यात आला आहे. मात्र, या करारानुसार ही वाघनखे महाराष्ट्राला कायमस्वरुपी देण्यात येणार नसून ती तीन वर्षांच्या कर्जाऊ तत्वावर मायदेशी येणार आहेत. यासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी मंगळवारी एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी ही वाघनखं छत्रपती शिवरायांनी अफजल खान वधावेळची असण्याची ‘शक्यता’ असल्याचं म्हटलं असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याच सोबत वाघनखं महाराष्ट्राला कायमस्वरुपी देण्यात येणार नसून ती तीन वर्षांच्या कर्जाऊ तत्वावर मिळणार असल्याच्या निर्णयाला वेदनादायी म्हटलं आहे.

छत्रपती संभाजी राजे यांनी लिहिलेली पोस्ट पुढील प्रमाणे आहे. ‘लंडन येथील संग्रहालयात असणारे वाघनखे महाराष्ट्रात तीन वर्षांच्या मुदतीवर प्रदर्शनासाठी आणले जात आहे. हे वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधावेळी वापरले असल्याचा दावा राज्य सरकार करत आहे, मात्र अनेक इतिहास तज्ञांनी त्यामध्ये दुमत व्यक्त केले आहे. 2017 साली मी याठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी तिथे लिहिलेल्या माहिती फलकावर केवळ तशी ‘शक्यता’ असल्याचे लिहिलेले पाहण्यात आले होते. सरकारने या विषयावर सर्व विचारधारेच्या इतिहास तज्ञांशी चर्चा करून एकमताने मार्ग काढावा. मात्र, सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी भेट म्हणून दिलेल्या या वाघनखांस ऐतिहासिक मूल्य आहे, हे कुणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे आपल्या इतिहासाशी निगडीत ऐतिहासिक महत्त्व असणारे हे वाघनख केवळ तीन वर्षांच्या मुदतीवरच आणले जात आहे व मुदत संपल्यावर ते इंग्लंडला परत करावे लागेल, हे वेदनादायी आहे. त्यामुळे सरकारने हे वाघनख कायमस्वरूपी त्याच्या मूळ ठिकाणी, म्हणजेच महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न करणे अधिक गरजेचे आहे’.